रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लुटणारे जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्याने जाणाऱ्यांना अडवून लुबाडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली आहे. सलीम साहेबलाल शेख (पिंपळे गुरव), अजय रमेश चव्हाण (२०, औंधगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

औंध येथील डीपी रोडवरून एक तरुण दुचाकीवरून जात असलाना डीएव्ही स्कुलसमोर एक अनोळखी तरुण दुचाकीवरून आला. त्याने तरुणाला नाव विचारले, त्यानंतर कट्ट्यावर बाजूला बसलेले आणखी दोन जण तेथे आले. ते काही तरी करतील या भितीने तरुणाने भावाला फोन लावण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. तेव्हा एकाने त्याचा मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो तरुण पळत सुटला, तेव्हा एकाने पाठीमागून दगड मारला आणि त्याच्या दुचाकीचे नुकसान केले.

याप्रकरणी तरुणाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश काळे, दत्तात्रय फुलसुंदर य़ांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सलीम शेख व अजय चव्हाण यांनी हा प्रकार केला आहे. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार शंकर पाटील, पोलीस कर्मचारी दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, भालचंद्र बोरकर, रमेश साबळे, सचिन ढवळे यांच्या पथकाने केली.