बसस्थानक परिसरातील गर्दीत लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल तसेच मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाइल व दुचाकी मुद्देमाल जप्त केला आहे.

राकेश जॉन सकट (वय १९) आणि किरण रमेश गालफाडे (वय २१, दोघे रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांचे नावे आहेत.

शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्थानक आणि पीएमपीएल बस स्थाम्ब्यावर प्रवाशांचे मोबाईल आणि दागिने पळविणाऱ्या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नागरिकांचे खिसे साप करत आहेत.

दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी संतोष धर्माधिकारी (वय २४,रा. अहमदनगर) हे मध्यरात्री शिवनेरी बसने कोल्हापूरहून पुण्यात आले होते. शिवाजीनगर एसटी स्थानकात उतरल्यानंतर ते नगरला निघाले होते. पाटील इस्टेट भागात सकट आणि गालफाडे दुचाकीवरुन आले. त्यांनी धर्माधिकारी यांना धमकावले. त्यांच्याकडील अडीच हजार रुपये तसेच दोन मोबाइल संच काढून घेतले. सकट, गालफाडे आणि त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार तेथून पसार झाला.

या गुन्ह््याचा खडकी पोलिसांकडून तपास सुरू होता. यावेळी सकट, गालफाडे व साथीदार अनिकेत जाधव यांनी शिवाजीनगर भागात प्रवाशांना लुटल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. दोघांनी शिवाजीनगर परिसरात आणखी काहीजणांना लुटल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक शफील पठाण, प्रताप गिरी, रमेश तापकीर, उत्तम कदम, अण्णा ठोकळ, संतोष सावंत, राजकिरणपवार, गणेश लोखंडे, संदीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/