उस्मानाबाद : अजिंक्यराजे पेट्रोल पंपावर दरोडा, कामगार जखमी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परांडा शहरातील अजिंक्यराजे पेट्रोलपंपावर दरोडेखोरांनी सोमवारी (ता. 9) पहाटे अडीचच्या सुमारास दरोडा टाकून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तीन कामगार जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे.

शहरातील कुर्डुवाडी मार्गावर समसमपुरा मारुती मंदीराजवळील हेमंत निवृत्ती शिंदे (रा. शिंगेवाडी, ता. माढा) यांच्या मालकीचा अजिंक्यराजे पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास चार ते पाच बुरखाधारी दरोडेखोरांनी येऊन पेट्रोलपंपावरील कामगारास झोपेतून उठवून लोखंडी राॅडने डोक्यात, कपाळावर मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत कामगार प्रशांत रामचंद्र नरसाळे (वय ३५, रा. डोमगाव, ता. परंडा) गंभीर जखमी झाले. त्यांना पहाटेच परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

जखमीवर वैद्यकीय अधिकारी डाॅ. अबरार पठाण यांनी उपचार केले. नरसाळे याच्या डोक्यास दहा ते बारा टाके पडले आहेत. याच पंपावरील मॅनेंजर असलेले अजित गायकवाड व श्रीरंग खरात या दोघांनाही मारहाण करीत दरोडेखोरांनी डोळ्यात चटणीपुड फेकली. त्यांच्याकडील कपाटाच्या चाव्या हिसकावुन आतील एक लाख ९२ हजार ५७० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.

दरोडेखोर आले त्यावेळी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे स्वीच ऑफ होते. सोमवारी सकाळी पोलिसांनी याची पाहणी केली. त्यामुळे दरोडेखोर कॅमेराकैद होऊ शकले नाही. घटनास्थळाला उस्मानाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोदे, पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. माने सकाळी दहा वाजता दाखल झाले. परांडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड हे पोलिस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. शहरात या दरोड्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी पेट्रोलपंपावर गर्दी केली होती. ठसे तज्ज्ञ पथक तपासकामी कार्यरत होते.

आरोग्यविषयक वृत्त –