सुपा घाटात ट्रकवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील चौफुला-मोरगाव रोडवर सुपा घाट येथे अज्ञात इसमांनी ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघांना ट्रकसह पळवून अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकसह त्यामधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरण्याचा प्रकार घडला होता. या टोळीतील ८ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा एल.सी.बी टिमने ताब्यात घेवून ३ दिवसात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक २५ मार्चला सकाळी ११.०० वा. चे सुमारास रामप्रसाद राठोड (रा.राजस्थान ) हे त्यांचे ताब्यातील ट्रक (नंबर आर.जे १७ जी.ए. ६७२८) यामध्ये गव्हाच्या गोण्या राजस्थान ते गोवा असे घेवून जात होते. दरम्यान चौफुला-मोरगाव रोडवर सुपा घाटाचे पहिल्या वळणावर अज्ञात चोरट्यांनी त्यांचे ट्रकला बिगर नंबरची वॅगनआर कार आडवी लावली. त्यानंतर ट्रक चालकास दमदाटी करुन ट्रकमधील दोघांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्या चालकांना वॅगनकारमध्ये पळवून नेवून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. आरोपींनी ट्रक व त्यामधील ३१५ गव्हाची गोणी असा एकूण १६ लाख ९३ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.  तसेच ट्रकचे दोघे चालक यांना तिसऱ्या दिवशी बारामती येथे निर्जन ठिकाणी सोडून दिले होते. त्याबाबत रामप्रसाद राठोड यांनी दिनांक 28 मार्चला यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने यवत पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाकडून पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयात गुन्हयाचा तपास चालू होता. पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मांडवे (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथील सागर अंबादास चव्हाण व त्याचे साथीदारांनी ट्रक लुटल्याची माहिती मिळाली. यावरून सागर अंबादास चव्हाण (वय २५ वर्षे रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) , मंगेश उर्फ पप्पू राजेंद्र चव्हाण (वय २६ वर्षे रा. क-हावाघज, ता.बारामती, जि.पुणे), सुरज लक्ष्मण गाडे (वय २१ वर्षे रा. सावंतवाडी, ता. बारामती, जि. पुणे), रेवणनाथ प्रभाकर जाधव (वय २६ वर्षे रा. विट, ता. करमाळा, जि. सोलापूर), उमेश मधुकर काळे ( वय २७ वर्षे रा. वाशिम, ता. कर्जत, जि. अहमदनगर), शेखर सुभाष शिंदे (वय २४ वर्षे, रा.सांगवी, ता.बारामती, जि.पुणे), सचिन महादेव गेजगे (वय ३१ वर्षे रा.मांडवे, ता.माळशिरस, जि.सोलापूर) व महेश मारुती पेड़कर (वय ३६ वर्षे रा.फोंडशिरस, ता.माळशिरस, जि.सोलापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली.

तपासामध्ये त्यांनी संगनमताने मिळून ट्रकवर दरोडा टाकून चोरलेल्या गव्हाच्या गोण्या महेश पेड़कर याच्या मध्यस्थीने नातेपुते येथे विकून मोकळा ट्रक हा करमाळा जि.सोलापूर येथे निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचे सांगितले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार, स्कार्पिओ जीप तसेच चोरलेला ट्रक व गुन्हयातील माल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने, सहा. उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, अनिल काळे , रवि कोकरे , महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, राजू मोमीन, बाळासाहेब खडके तसेच यवतचे पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, गणेश पोटे, संदीप कदम, होळकर यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे.

यातील आरोपी रेवणनाथ जाधव याचेवर दौंड पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी उमेश काळे याचेवर इंदापूर पोलीस स्टेशनला वाहनात प्रवासी म्हणून बसवून लूटमार केलेबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने यापूर्वी अटक केलेली होते. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे हे करीत आहेत.