चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरावर धाडसी दरोडा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – व्यापाऱ्याच्या घरात शिरुन चोरट्यांनी चाकूच्या धाकाने धाडसी दरोडा टाकल्याची घटना आज (मंगळवार) पहाटे जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत घडली. चोरट्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत घरातील दागिने, रोकड असा एकूण तीन लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रितेश जवाहरलाल कटारिया (वय-३४ रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपसण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

घटनेची माहिती अशी की, रितेश कटारिया यांचे फुले मार्केटमध्ये रेडीमेट कापड दुकान आहे. सिंधी कॉलनी ते आकाशवाणी रस्त्यावरील गणेश नगरातील निलेश अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर कटारिया, पत्नी साक्षी व मुलगा पियुष (वय ५) वास्तव्याला आहेत. सोमवारी रात्री दुकानाचा हिशेब करुन १२ वाजता घर बंद करुन झोपले. पहाटे चार वाजता अचानकपणे दरवाजा तोडून चार जण घरात शिरले. जोराचा आवाज ऐकून घाबरलेले कटारिया दाम्पत्य झोपेतून उठून बेडरुमधून हॉलमध्ये आले असता तोंडाला मास्क बांधलेले चार जण कटारिया यांच्याजवळ आले. त्यातील एकाजवळ सुरा तर दुसऱ्याजवळ स्क्रु ड्रावर होता. अन्य दोघांच्या हातात बॅटरी होत्या. चौघांपैकी एका दरोडेखोराने कटारिया यांच्या मानेला सुरा लावत रितेश कटारिया यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी तोडली नंतर दोघांनी स्क्रु ड्रायवरने कपाट उघडले व त्यातील दागिने, पाचशे रुपये रोख व एक मोबाईल असा तीन लाख रुपयांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगारास पिंपरी पोलीसांकडून अटक