गुजरातमधील चौघांना लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून गुजरात मधील चव्हाण यांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आज पहाटेच्या सुमारास चौघांना श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील साखळी मंदिर परिसरातून अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये पिंटया भास्कर काळे (वय ३५, रा. कोरेगाव, ता. श्रीगोंदा), सुनिल भास्कर काळे (वय ५० रा. कोरेगांव,  ता. श्रीगोंदा), मंगेश संजय चव्हाण (वय २१), वाल्मीक संजय चव्हाण वय१८ दोघे रा. गुंडेगांव, ता. नगर) यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 1) मीनल रमेश परमार (रा-गणेश चौकी, मंगलपुरा, सोमनाथ जि-आनंद, राज्य गुजरात) यांना अज्ञात आरोपींनी फोन करुन स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावचे शिवारात हॉटेल सायंतारा येथे बोलावून चौघांना मारहाण करून पावणे दोन लाख रुपयांना लुटले होते. त्यावरून बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोडा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यांच्यासह उपनिरीक्षक ज्ञानेश फड़तरे, रोहन खंडागळे, सचिन खामगळ, पोलीस कर्मचारी मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले, योगेश सातपुते, सागर सुलाने, रविकिरण सोनटक्के, योगेश गोसावी, दिपक शिंदे, सचिन कोळेकर आदींनी घटनास्थळी भेट देवून सदर गुन्ह्याचा संमातर तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे नमुद गुन्ह्यातील काही आरोपी हे चिखली शिवारातील साकळाई मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून बातमीतील चौघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी बेलवंडी पोस्टे चा वरील गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून गुन्हयातील ६ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून दिली. त्यांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी बेलवंडी पो.स्टे ला हजर केले आहे.