घरफोडी करणारी परदेशी नागरिकांची टोळी जेरबंद 

म्हापसा : पोलीसनामा ऑनलाइन – गोव्यात जगभरातून नागरिक पर्यटनांसाठी येत असतात. पर्यटनाच्या नावाखाली येऊन घरफोडी करणारी विदेशी नागरिकांची आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस आली आहे. जॉर्जियाचे नागरिक असलेल्या या टोळीतील ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोन्स्टटाईन लायदेझ (वय ४६), लुरा पिरवेली (वय ४२), लाशा गुरचीआनी (वय ४६), रावली तामीयानी (वय ३३) अशी त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मारिया इझाबेला फर्नांडिस (वय ५०, रा. बामणवाडी, शिवोली) यांनी फिर्याद दिली आहे. मारिया फर्नांडिस यांच्या घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री उशीरा ते घरी परतले. तेव्हा चोरट्यांनी घर फोडून कपाटातील सोन्याचा नेकलेस, बांगड्या, कानातील रिंग, रोख रक्कम असा ११ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

पोलिसांनी घरफोडी झालेल्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा एका कारमधून आलेल्या काही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ते एका स्थानिकांशी बोलतानाही आढळून आले. या स्थानिकाकडे चौकशी केल्यावर ती कार रेंट कार असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर जॉर्जिया येथील नागरिकांनी ती भाड्याने घेतल्याची व ती हडफडे येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने हडफडे येथे गाडी असलेल्या ठिकाणच्या एका इमारतीमधील खोलीवर छापा टाकून चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ४५ हजार ९२० रोख तसेच ५९० यूएस डॉलर, दोन नेकलेस, १२ कानातील रिंग, एक अंगठी, एक पैंजण, तीन बांगड्या, एक नेकलेस, दोन कडे, वितळलेले सोने असा एकूण ९ लाखांचा ऐवज हस्तगत केला.

हे सर्व जण ६ मार्चला हडफडे येथे येऊन भाड्याने रहात होते. कार भाड्याने घेऊन पर्यटक असल्याचे दर्शवून ते घरफोड्या करणार होते. पण, पहिल्याच घरफोडीत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पोलिसांनी त्यांच्याकडून आयटेन रेंट अ कार, एक स्टिल टॉर्च, काळ्या दांड्याची एक पिलर, नारिंगी रंगाचे ग्लोव्ह, दोन स्क्रू ड्रायव्हर टापारिया कंपनीचे, एक स्क्रू ड्रायव्हर, एक अ‍ॅक्सो ब्लेड, एक हातोडा, एक करवत, टेप, केबल, हायड्रॉलिक, कटर मशीन, पाच ग्रायंडर, ब्लेड, एक्स्टेशन कॉर्ड अशी घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली.

ह्याही बातम्या वाचा –

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us