Pune News : ‘कोरोना’च्या नियमावलीच्या आडून हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट, बाटलीबंद पाण्याची केली जातेय सक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुण्यातील व्यवसाय सुरु झाले आहेत. हॉटेल व्यवसायिकांना देखील नियमावाली जाहीर करुन त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्यातील काही हॉटेल चालकांकडून कोरोना नियमावलीचा आधार घेत ग्राहकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. बाटली बंद पाण्याची सक्ती ग्राहकांना केली जात आहे. परंतु त्याचवेळी हॉटेल चालकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला जात आहे.

पुण्यातील फर्ग्यूसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या ठिकाणी असलेल्या नामवंत हॉटेलमध्ये असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमधून पाणी देण्या ऐवजी ग्राहकांना बाटलीबंद पाणी दिले जाते. या बाटलीबंद पाण्याचे 10 रुपये बिलातून वसूल केले जातात. मात्र, बाटलीबंद पाण्याचे पैसे आकरण्यात येतील याची पूर्व कल्पना ग्राहकांना देण्यात येत नाही. चहा प्यायला तरीही त्याबरोबर पाणीही विकतच घ्यावे लागत आहे.

हॉटेल चालकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या बटल्यांमध्ये अर्धा लिटर पाणी असते. तेही थंड दिले जात नाही. खाण्यासाठी काही मागवले तर एकापेक्षा जास्त बाटल्या लागतात. प्रत्येक बाटलीसाठी दहा रुपये आकारले जातात. यासंदर्भात ग्राहकांनी चौकशी केली तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनापासून बचावासाठी काही नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये हॉटेलमध्ये सुटे पाणी, ग्लास ठेवले जाणार नाहीत असे ठळकपणे लिहिलेले आहे, असे वेटरकडून सांगण्यात येते.

केंद्र व राज्य सरकारच्या याच नियमावलीमध्ये ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असाही नियम आहे. मात्र, त्याकडे या हॉटेल चालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या हॉटेलमध्ये पाण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे नियम पाळले जातात परतु गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी हा नियम पाळला जात नाही. गर्दी होत असल्याने हॉटेलमधील सर्व टेबल वापरले जातात. फर्ग्युसन रस्त्यावरील काही व्यावसायिक सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करताना दिसून येतात. एवढेच नाही तर या ठिकाणी मोफत बाटलीबंद पाणी दिले जाते.

पुणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, पाण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने नियमावलीत ठळक उल्लेख आहे. पाण्याचे ग्लास, जग व त्याची सतत हाताळणी यामधून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने बाटलीबंद पाण्याचा नियम केला आहे. हॉटेल चालकांना कोणताही धोका पत्करायचा नसल्याने आणि नियमात अडकायचे नसल्याने त्यांच्याकडून बाटलीबंद पाण्याची सक्ती केली जाते. सुरक्षित अंतर नसेल तर प्रशासनाने कारवाई करावी असे शेट्टी यांनी सांगितले.