अजमेर एक्स्प्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारी, ३ अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन – अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत लुटले. चोरट्यांनी अचानक रेल्वेच्या डब्यात घुसुन चाकूचा धाक दाखलत लुटमारी केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तर काही धडसी प्रवाश्यांनी तीन जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. प्रवाशांनी आरडा ओरड केल्याने इतर डब्यातील प्रवशांमध्येही घबराहट निर्माण झाली होती. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला.

रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सागर संजय शिंदे (वय 23), अजय तानाजी चव्हाण (21) आणि सुरज राजेंद्र कणसे (20, सर्व रा. कराड) यांचा समावेश आहे. तर सोमनाथ शिवाजी जाधव, सुरज राजेंद्र पावसकर आणि प्रविण आप्पा माने हे तिघेजण पळून गेले आहेत. संजय धोंडीराम पिसे (वय 27, रा. इचलकरंजी), सुनिल अजय कार्वेकर आणि योगेश राजेंद्र चव्हाण या तिघा प्रवाशांना सातारा-कराड दरम्यान 6 दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील किंमती मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 20 हजार 50 रुपयांचा ऐवज काढून घेतला. हा प्रकार सुरू असताना सह प्रवाशांनी आरडाओरडा करुन तीन जणांना पकडले. व मिरजेत रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले. या सर्व प्रकारामध्ये अन्य तिघेजण मात्र पळाले.

पोलिसांनी वरील तिघांकडून चोरलेला 1 मोबाईल यासह अन्य गुन्ह्यातील 1 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लुटमार प्रकरणी संजय धोंडीराम पिसे (रा. इचलकरंजी) यांनी मिरज रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरोडेखोरांनी संजय पिसे यांचा 16 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व रोख 2 हजार 500 रुपये, सुनिल कार्वेकर यांचे 750 रुपये आणि योगेश चव्हाण यांचे 800 रुपये रोख चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने काढून घेतले. असे पिसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तीन दरोडेखोरांकडून इतर गुन्ह्यात चोरलेला 1 मोबाईलही हस्तगत केला आहे. तसेच 1 हजार 450 रुपये रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 4 दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून रेल्वेतील आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.