जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने चार गुन्हेगारांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई ताथवडे रोड, बीएलसी कॉलेज समोर करण्यात आली.

समीर उर्फ दावल चाँदपाशा शेख (वय-२१ रा. दाभाडे चाळ, नवलाख उंबरे), वैभव उर्फ कांचा जगदीश कल्याणकर (वय-१८ रा. माणदेवी मंदीराशेजीरी, माणगाव), युसुफ मुसा शेख (वय-२१ रा. सोनवणे वस्ती, ताथवडे), मुंजाजी बालाजी अडकिने (वय-१९ रा. नवलाख उंबरे) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ चे सहायक पोलीस फौजदार संपत निकम व पोलीस हवालदार नारायण जाधव यांना जबरी चोरी करणारे गुन्हेगार ताथवडे येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून समीर आणि वैभव या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान युसुफ आणि मुंजाजी यांची नावे त्यांनी सांगितले. पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यातील १ लाख ६० हजार २०० रुपयांचे चार मोबाईल आणि ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि दुचाकी जप्त केली आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी फारुख मुल्ला, लक्ष्मण आढारी, मयुर वाडकर, जमिर तांबोळी, संदिप ठाकरे, हजरत पठाण, संजय गवारे, किरण आरुटे, दत्तात्रय बनसुडे, धर्मराज आवटे, धनराज किरनाळे यांच्या पथकाने केली.