तळेगाव दाभाडेमध्ये ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून दरोडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तळगाव दाभाडे येथील घरात शिरुन चोरट्यांनी ज्येष्ठाचे हातपाय बांधून जीवे मारण्याची धमकी देत घरातील पावणेपाच लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना तळेगाव दाभाडेमधील सोमवार पेठेत सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. याप्रकरणी सुरया अब्दुल तांबोळी (वय ६५, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरया तांबोळी हे घरात एकटेच असताना दोघे जण घरात शिरले. त्यांनी तांबोळी यांचे हातपाय बांधले. लोखंडी गजाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. हाताने मारहाण करुन त्यांच्याकडे दागिने कोठे आहेत, याची विचारणा केली. बेडरुममधील लोखंडी पेटीची चावी जबरदस्तीने घेतली. लोखंडी पेटीतील ७ तोळे वजनाचा राजमाता हार, अर्धा तोळा कर्णवेल, ६ तोळे वजनाच्या दोन बांगड्या, आयरीन, ३ तोळ्याचे मंगळसुत्र व १ लाख ६६ हजार रुपये असा ४ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोवारी तपास करीत आहेत़