माधवनगरमध्ये सराफी दुकान फोडले, 9 लाखाचा ऐवज लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील माधवनगर येथे मंगळवार पेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानाचे छत फोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने व सात किलो चांदी असा  नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. अत्यंत गजबजलेल्या भरवस्तीत चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे संजयनगर पोलिसांना आव्हान दिले आहे.

बुधगाव येथील दत्तात्रय कदम यांचे मधवनगरमध्ये मंगळवार पेठेत मुख्य रस्त्यालगत दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या छताची कौल काढून दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील एक लाखाची रोकड लंपास केली. त्यानंतर तिजोरी फोडली. यामधील चांदीच्या गणेश मूर्ती, अन्नपूर्णा लक्ष्मी मुर्ती, चांदीचा करंडा, पैजण, जोडवी अशी दोन लाख रूपयांची पाच किलो चांदी लंपास केली. तसेच दहा नग सोन्याचे मणीमंगळसुत्र, साठ लहान अंगठ्या, तीन बोरमाळ, दोन चेन, नक्षी मळी, तास मणी असे पंधरा तोळे सोने लंपास केले.

बुधवारी सकाळी नऊ वाजता कदम दुकान उघडण्यासाठी आले. दुकान उघडल्यानंतर त्यांना छत फुटलेल्या अवस्थेत दिसले. दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संजयनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या पथकाने  घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान दुकानपासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. तज्ञांना महत्वाचे ठसे मिळाले आहेत. दोन चोरटे छताची कौले काढून दुकानात प्रवेश करताना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/