भर दिवसा मंदिराची दानपेटी फुटून रक्कम लंपास 

संगमनेर :  पोलीसनामा ऑनलाईन – आज ७ नोव्हेंबरला भर दिवसा श्री क्षेत्र अकलापूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  संगमनेर तालुक्यातील आकालापूर गावात श्रीदत्ताचे भव्य मंदिर आहे. गावापासून थोड्या अंतरावर हे मंदिर आहे. जागृत देवस्थान असल्याने हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. गावापासून लांब असल्याने दुपारच्या वेळी मंदिराकडे जास्त कोणी जात नाही याचाच फायदा घेत, चोरटयांनी दुपारी अडीचच्या सुमारास मोठ्या शिताफीने दानपेटी फोडत दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली.
हा चोरीचा सर्व प्रकार मंदिर प्रशासनाच्या लक्षात आला नाही त्यावेळी चोरीचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला त्यादरम्यान नागरिकांनी हा सर्व प्रकार मंदिर प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यावेळी  घारगाव पोलिसांना संपर्क साधला. त्यावेळी तेथिल सीसीटीव्ही फुटेज पहिले असता. सर्व प्रकार समोर आला.
दानपेटीतील किती रक्कम चोरांनी लंपास केली आहे याचा अद्यापही तपस लागला नाही. अधिक तपस पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे  यापूर्वी चोरट्यांनी दत्त मंदिरावरील सोन्याचा मुलामा असणारा कळस कापून पोबारा केला होता. त्या घटनेचा दोन वर्षानंतरही तपास लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा दिवसाढवळ्या दानपेटी फोडल्याने, एकप्रकारे चोरट्यांनी घारगाव पोलिसांना चॅलेंजच दिलं आहे. त्यामुळे दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी लवकरात लवकर आवळाव्यात, अशी मागणी दत्त देवस्थान, ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत.