आता रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; ED कडून होणार चौकशी ?, न्यायालयात अटकेची याचिका दाखल

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 17 जानेवारी : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अटकेची याचिका दाखल केलीय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रॉबर्ट वाड्रा यांची एएसजी राजदीपक रस्तोगी, तर ईडीकडून भानुप्रताप बोहरा हे बाजू मांडणार आहेत.

जाणून घ्या, नेमकं प्रकरण काय?
2007 साली रॉबर्ट वाड्रा यांनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. वाड्रा आणि त्यांच्या मातोश्री मौरीन या कंपनीच्या संचालक पदावर आहेत. त्यानंतर कंपनीचं नाव बदलून स्कायलाइट हॉस्पीटॅलिटी लिमिटेड लायबिलीटी असं केलं. कंपनीच्या नोंदणीवेळी ही कंपनी रेस्टॉरंट, बार आणि कँटीन चालविण्याच्या क्षेत्रात काम करणार आहे, असे सांगण्यात आलं होतं.

तर, 2012 साली खरेदी केली होती जमीन
रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने 2012 साली जोधपूरच्या कोलायत येथे काही दलालांच्या माध्यमातून 270 बिघा जमीन 79 लाख रुपयांत खरेदी केली होती. ही जमीन बिकानेर येथील भारतीय सेनेच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी दिली होती. तर येथून विस्थापित झालेल्यांसाठी दुसर्‍या ठिकाणी 1400 बिघा जमीन दिली होती. पण, काही लोकांनी या जमिनीचे खोटी कादगपत्र तयार करुन रॉबर्ट वाड्राच्या कंपनीला विकले होते.