रॉबर्ट वाड्रा मुरादाबादमधून निवडणूक लढणार ?

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर आता त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील राजकारणात प्रवेश करणार असल्‍याची चर्चा सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यावर लावण्यात आले आहेत.

एक दिवसापूर्वीच खुद्द वाड्रा यांनीच फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. असे असतानाच मुरादाबादमध्ये युवक काँग्रेसकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘रॉबर्ट वाड्रा जी, मुरादाबाद लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे. असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशवासियांसाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडणार
वाड्रा यांनी काल राजकारण प्रवेशाविषयी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली होती पोस्टमध्ये त्यांनी म्हणले होते की, ‘मनी लाँडरिंगच्या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. याप्रकरणी माझी सध्या चौकशी सुरु आहे. ही चौकशी संपल्यानंतर मी देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यातही प्रामुख्याने उत्तर प्रदेशवासियांसाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.” गेल्या काही वर्षांपासून देशातील सरकार मला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचत आहे. परंतु त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप खोटे असल्याचे एव्हाना लोकांना समजले आहे. देशातील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. अनेकांचा मला पाठिंबादेखील आहे. मी या लोकांचा ऋणी आहे.

नुकतेच वाड्रा यांनी फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांनतर अशा पद्धतीचे पोस्‍टर मुरादाबादमध्‍ये दिसल्‍याने वाड्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या मैदानात उतरणार का, याबद्‍दल जोरदार चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.