‘पेट्रोल-डिझेल’च्या दरवाढीचा रॉबर्ट वाड्रा यांना ‘फटका’; सायकलवरून गेले ऑफिसला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेसकडून याच मुद्द्यावरून सरकारला घेरले जात आहे. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनीही कडाडून विरोध केला. त्यानुसारच त्यांनी ऑफिसला जाताना कारने न जाता चक्क सायकलवरून गेले आहेत.

रॉबर्ड वाड्रा हे ऑफिसला कारने गेले नाहीत तर त्यांनी सायकलचा पर्याय निवडला. त्यांच्या या सायकलस्वारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर रॉबर्ड वाड्रा म्हणाले, की सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांबाबत विचार करत नाही. हीच एक मोठी अडचण आहे. याच अडचणींमुळे कारने न जात सायकलने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्र्यांनी विशेष पावले उचलावीत

रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनाही आवाहन केले आहे. यामध्ये ते म्हणाले, देशातील पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि टॅक्सच्या पार्श्वभूमीवर विशेष पावले उचलावीत. सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळेच सायकलच्या माध्यमातून ऑफिसला जाण्याचे ठरवले.

प्रियांका गांधींनीही साधला निशाणा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर प्रियांका गांधी यांनीही सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करून सांगितले होते, की भाजप सरकारकडून ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जाणार नाहीत, त्यादिवशी ‘अच्छा दिन’ म्हटले जाईल. कारण वाढत्या महागाईनुसार सर्वसामान्यांसाठी हे ‘महंगे दिन’च आहे.