Coronavirus : ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना मदत होणार, इयत्ता 7 वी मधील मुलानं केलं ‘असं’ काही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. या संकटात डॉक्टर व प्रशासन देखील दिवस रात्र एक करून कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी काम करत आहे. तर अनेक जण कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी कसा हातभार लागेल यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, औरंगाबादच्या एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने आपले कौशल्य दाखवत कोरोना संसर्गित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मदत होईल असा एक रोबोट तयार केला आहे.

औरंगाबाद येथील साई रंगदाळ या सातवीत शिकणाऱ्या मुलाने सुट्टीत शौर्य नावाचा रोबोट बनवला असून, तो औषध घेऊन जाण्याचे काम करतो. हा शौर्य बॅटरीवर चालतो. मोबाईलवरून ऑपरेट होतो आणि तुम्हाला हवं ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो. साई याने हा शौर्य साकारला तो अवघ्या दीड ते दोन हजार रुपयांच्या खर्चात.

सध्या देशात सगळीकडे कोरोना संसर्गाचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी जनतेला संबोधित करताना कोरोना संसर्गित रुग्णांशी संपर्कात येता कामा नये यासाठी सोशल डिस्टंन्सिंग च्या बाबतीत वारंवार सूचना करत आहे. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा उपचाराकरिता किंवा खाणं पिणं देण्याकरिता रुग्णांशी सतत संपर्क येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची भीती असते. त्यावर उपाय म्हणून शौर्यची निर्मिती साईने केली आहे. सध्या सुरु असलेला कोरोना संसर्गाचा प्रकोप त्यानं बातम्यात पहिला आणि त्यातून त्यानंही शक्कल लढवली.

घरात असलेले बॉक्स, एक प्रोगामिंग की बोर्ड, एक ब्लु टूथ, हे सगळं मोड्यूल एन्ड्रॉईड मोबाईलशी जोडलं. रोबोटला चाकं लावली, एक रिचार्जेबल बॅटरीही बसवली आणि किमया करीत हा रोबोट साकारला. पंतप्रधानांनी सगळ्यांनाच मदतीचं आवाहन केलं होत. त्यानंतर माझाही एक छोटासा प्रयत्न म्हणून साई याने हा शौर्य साकारला.

साईच्या वडिलांनी सांगितलं की, लॉकडाऊन झाल्यापासून काही तरी करण्याची त्याची धडपड सुरु होती आणि त्यातूनच त्याने घरी शक्य असलेल्या वस्तूंपासून शौर्य साकारला. तसेच त्याचे नवीन वस्तू करण्याची आवड आनंदनीय असल्याचं मत त्याच्या वडिलांनी व्यक्त केलं.

अवघ्या सातवीतील मुलाने इलेक्ट्रॉन्किस इंजिनिअरींगची फारशी माहिती नसताना देखील शौर्यची ही झेप कौतुकास्पद आहे. हा रोबो खरंच रुग्णालयात कामात येईल का नाही हे आगामी काळात कळेल. मात्र अडचणीच्या काळात आपणही देशाचं देणं लागतो व त्यासाठी साईंची ही धडपड निश्चितच वाखणण्याजोगी आहे.