औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ लढ्यात ‘रोबोट’ची होतेय मदत !

Link photo

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या लढ्यासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे. विलगीकरण कक्षातील व्यक्तींना जेवण पोहोचविण्यासाठी रोबोटची मदत घेतली जात असून हा प्रयोग औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आला आहे. शहरातील रोबोट निर्मितीच्या क्षेत्रातील तरुण उद्योजक रोहित दाशरथी यांनी विलगीकरण कक्षातील जेवण पुरविण्यासाठी एक रोबो महापालिकेकडे दिला आहे.

रोबोटचा एमजीएम येथील विलगीकरण केंद्रात उपयोग सुरू आहे. तर जिल्हा रुग्णालयात या प्रयोगाची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सफाई करण्यासाठी दोन्ही बाजूला फवारणी करता येईल अशी यंत्रणाही बसविल्याने त्याचा अधिक फायदा होईल, असा दावा केला जात आहे.‘ रुचा यंत्रा’ या कंपनीमार्फत केला जाणारा हा प्रयोग सध्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांचा धोका कमी करण्यात महत्त्वपूर्ण मदत करीत आहे.

एका रोबोला पाठीमागच्या बाजूने आता निर्जंतुकीकरणासाठी फवारणी यंत्रणाही बसविण्यात आली. 25 लिटरचे सोडियम हायपोक्लोराइडचे मिश्रण वाहून नेण्याची क्षमता आहे. औषध फवारणी करताना किती दाब असावा, किती औषध सोडले जावे, याचे नियंत्रणही मोबाइलवरून करता येत आहे. तर दुसर्‍या रोबोमध्ये तयार जेवणाची पाकिटे आणि औषध गोळ्या ठेवण्याचे ताट अशी त्याची रचना आहे. हे दोन्ही रोबो मोबाइलद्वारे संचलित करता येतात. त्यामुळे करोना वॉर्डातील संपर्क कमी होईल आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा धोका कमी होईल, असे दाशरथी यांनी सांगितले आहे.