रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्यांनो सावधान !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – रॉंग साईडने वाहने दामटणे चांगलेच महागात पडू शकते. पुणे पोलिसांनी रॉंग साईटने वाहन चालविणाऱ्यांवर मागील वीस दिवसात तब्बल ६३३ गुन्हे दाखल केले आहेत. भादंवि २७९ नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर १ हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. मागील काही दिवसात हेल्मेट सक्तीला विरोध होत असतानाही एक लाख ३६ हजार पुणेकरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वच प्रकारे वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणे खपवून घेतले जाणार नाही. असे पोलिसांनी यापुर्वीच जाहिर केले होते.

शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्तांमुळे अनेकदा वाहतुक कोंडी, अपघातांना सामोरे जावे लागले आहे. मागील महिन्यात वानवडी येथे शिवरकर रस्त्यावर भल्या सकाळी भरधाव वेगात येणार्‍या एका कारने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एका हुनमंत कांबळे (५९) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे यापूर्वीही अशा प्रकारे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालविणे ही एक विकृत मानसिकता असल्याचे तज्ञांचे मत आहे. शहरात पोलिसांनी असे ५३ स्पॉट स्पॉट शोधलेले आहेत. ते बंद करण्याबाबत पोलिसांकडून प्रयत्नही सुरु आहेत.

विरुद्ध दिशेने येणाऱ्यावर कारवाई करत असताना पोलिसांकडून मोटर वेईकल कायद्यानुसार केवळ २०० रुपये दंड आकारण्यात येत होता. २०१८ मध्ये अशा ६० हजार ३३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्यां वर भादंवि कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी वाहतुक शाखेने उलट्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या चार तासांमध्येच संबंधीत वाहनचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

तर १ जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत शहरातील ६३३ गुन्हे दाखल केले आहेत.

– काय आहे भादंवि २७९

इतरांच्या जिविताला धोका निर्माण होईल, किंवा ईजा पोहोचविण्याच्या इराद्याने जाणीवपुर्वक बेदरकारपणे वाहन चालविणे. यासाठी कलम २७९ नुसार एक हजार रुपये दंड, सहा महिने तुरुंगवास, किंवा दोन्ही एकत्र अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

वाहतुक विभागनिहाय आकडेवारी

शिवाजीनगर – ९६

दत्तवाडी – ६७

विमानतळ – ५०

कोरेगाव पार्क – ४५

चतुश्रृंगी – ४३

हडपसर – ४०

वानवडी – ३९