रोहन गावस्करचा प्रस्ताव, राज्याने आपल्या खेळाडूंना BCCI प्रमाणे द्यावे वार्षिक कॉन्ट्रॅक्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – माजी भारतीय क्रिकेटर रोहन गावस्करने देशातील राज्य क्रिकेट संघांना भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) प्रमाणे आपल्या खेळाडूंना वार्षिक कॉन्ट्रॅक्ट देण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय राष्ट्रीय टीमकडून खेळणार्‍या क्रिकेटर्सना वार्षिक कॉन्ट्रॅक्टर देते आणि त्यांना मागील 12 महिन्यात कामगिरीच्या आधारावर विविध ग्रेडमध्ये विभागले जाते.

गावस्करने बुधवारी ट्विट केले की, सर्व राज्य संघांनी आपल्या खेळाडूंना वार्षिक कॉन्ट्रॅक्ट दिले पाहिजे जसे बीसीसीआय भारतीय टीमला देते. ए, बी, सी वर्ग. जर राज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले नाही तर अशा स्थितीत स्थानिक खेळाडूंना खर्च भागवणे अशक्य आहे. महान फलंदाज सुनील गावस्करचा मुलगा 45 वर्षांचा रोहन गावस्कर भारतासाठी 11 वनडे खेळला आहे. तसेच 2010 मध्ये दोन आयपीएल मॅच सुद्धा खेळला आहे. मात्र, स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळला आणि यशस्वी ठरला.

प्रथम श्रेणी क्रिकेटर्सच्या उपजिवेकेवर चिंता व्यक्त करत माजी क्रिकेटर गावस्करने ट्विट केले की, कोण कसा निर्णय घेऊ शकतो की कोणता खेळाडू पूर्ण सत्र खेळेल ? काही सिनियर खेळाडूंना मधूनच हटवले जाऊ शकत होते का ? त्या तरूणांचे काय ज्यांना पदार्पणाची संधी मिळू शकत होती ? त्यांना काहीच मिळणार नाही का? मर्यादित षटकांच्या तज्ज्ञांचे काय? लाल चेंडूचे तज्ज्ञ? गावस्करने पुढे लिहिले की, राज्य संघांनी खेळाडूंची देखभाल करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक खेळाडू ते आहेत जे खेळ पुढे नेतात. त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी वार्षिक कॉन्ट्रॅक्ट सुरू करा.

गावस्कर ज्यूनियरचा सल्ला अशावेळी आला आहे जेव्हा स्थानिक खेळाडूंना बीसीसीआयच्या मदतीची प्रतिक्षा आहे. कारण राज्य संघांनी आतापर्यंत आवश्यक माहिती पाठवलेली नाही. कोविड-19 महामारीमुळे बीसीसीआय मुख्यालय बंद असल्याने वेतन आणि भरपाईचे पैसे देण्यास विलंब होत आहे. तसेच बहुतांश स्थानिक खेळाडूंना मागील काही सत्रात बीसीसीआयच्या महसुलातील सुद्धा भाग मिळालेला नाही. बीसीसीआय नेहमी टीव्ही प्रक्षेपणातून मिळणार्‍या महसूलातील भाग स्थानिक क्रिकेटरला देते आणि असे सामान्यपणे सप्टेंबरमध्ये वार्षिक खाते तयार केल्यानंतर होते.