बिहार पोलीस एवढे कार्यतत्पर असतील माहित नव्हते, रोहित पवार यांचा टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. बिहार पोलिसांचे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हते. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असे म्हणत त्यांनी बिहार पोलिसांवर उपरोधिक टोला लगावला आहे.

फेसबुक पोस्टच्या माध्यामातून त्यांनी सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करत बिहार पोलिसांवर उपरोधिक टीका केली आहे. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचे नाव घेतले जाते, त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे.

त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हते. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असे म्हटले आहे.