कोरोनावरून ठाकरे सरकारला घेरणाऱ्या भाजपला पवारांनी लगावला टोला; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर कोरोनावरून ठाकरे सरकारला घेरणाऱ्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन सदृश्य नियम लागू करण्यात आले. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असताना आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण आहे. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगले असल्याने तिथे कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फेल ठरतो’.

तसेच ते म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन भाजपचे नेते राजकारण करणे थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटते. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याची विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. पण हे संकट रोखण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते सर्व राज्य सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.