‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देत रोहित पवारांचा मोदी सरकारला ‘चिमटा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात आज व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत असून प्रत्येकजण आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आहे. यामध्ये राजकारणी देखील मागे नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी देखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला व्हॅलेंटाइन डेच्या ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना त्यांनी मोदी सरकारला चिमटा काढत निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलरवरून मोदी सरकारला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना चिमटा देखील काढला आहे. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आजचा दिवस स्वच्छ व खऱ्या निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. तर आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या, गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

इंडियन ऑइलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144. 50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. यावरूनच आमदार रोहित पवार यांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.