रोहित पवारांची मंत्रिमंडळातील संधी हुकली, त्यांच्या फेसबुक पोस्टने चर्चांना ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना देखील मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. मात्र, रोहित पवार यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच त्यांनी फेसबुक पोस्ट लिहल्याने या चर्चांना आणखीनच उधान आले होते. अखेर रोहित पवार यांनी यावर पडदा टाकला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1182902511913229&id=763331783870306

एका न्युज चॅनलशी बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्यात अनेक लोक फिरत असतात, त्यात मी सुद्धा आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. नाराजी बाजूला ठेवून काम करायचं आहे. मला मंत्रिपद मिळावं यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले असतील त्यांचा मी आभारी आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहे. जी जबाबदारी आपल्याला दिलेली असते ती समर्थपणे पार करण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहे. त्यामध्ये मी सुद्धा आहे, असा माझ्या फेसबुक पोस्टचा अर्थ असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार म्हणून मी पहिल्यांदा निवडून आलो आहे. राज्यात असलेली महाविकास आघाडी नगर जिल्ह्यात दिसतेय. लोकांच्या हितासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा विजय हा त्या लोकांचाच होतो. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ते नाराज असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/