देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर आ. रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘तुमच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र सर्वांना मोफत लस देण्याबाबत राज्यातील मंत्र्यामध्ये मतभिन्नता आहे. असे असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मोफत लसीकरणाची भूमिका पंतप्रधानांनी मन की बातमध्ये स्पष्ट केली आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध विधान केली जात आहेत. ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात हे समजत नाही. मी यावर बोलणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांचे ते विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. मात्र आदित्य ठाकरेंनी मोफत लस देण्यासंदर्भातील ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी मोफत लसीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईतील अंधेरीमध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, लसीचा भार राज्य सरकारवर पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन रोहित पवार यांनी फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे म्हटले आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही, असे माध्यमांशी बोलताना आपल विधान ऐकल. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीच वक्तव्य झाले असावे. पण यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.