#Loksabha : तुल्यबळ उमेदवाराच्या शोधासाठी रोहित पवार नगरमध्ये दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार हे आज सकाळी नगरमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नेमकी कुणाला उमेदवारी देणे योग्य राहील, याबाबत ते कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार सूत्रांकडून समजले.प्रशांत गडाख यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

त्यामुळे आता आ.अरुण जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र जगताप यांचे भाजप आ. कर्डिले यांच्यासोबत असलेले नातेसंबंध व महापौर पदाच्या निवडणुकीत आ. जगताप कुटुंबियांच्या आदेशावरून पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलला होता. त्यामुळे आमदार जगताप यांना उमेदवारी देणे योग्य राहील की नाही, याची चाचपणी केली जात आहे.

तसेच कार्यकर्त्यांची मते आजमावून घेऊन लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीने नियोजन करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी रोहित पवार हे नगरमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. रोहित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतली जाणार आहेत.विखे यांच्यासाठी काँग्रेसला जागा न सोडल्यामुळे विखेंना भाजपात प्रवेश करावा लागला. त्यामुळे विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरच्या जागेबाबत विशेष लक्ष घातले आहे.