‘सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे कौतुक रणजितसिंह करणार का ?’

रोहित पवारांचा रणजितसिंहांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आजच भाजपात प्रवेश केला. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आयात उमेदवार उभं करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर सडकून टीका केली आहे. आयात उमेदवार उभं करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना त्यांनी ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’ असे म्हणत टीका केली आहे. इतकेच नाही तर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपाप्रवेशावर भाष्य करताना जहरी टीका करत ते म्हणतात की, “सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक रणजितसिंह करणार का ?”  रोहित पवार यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना, अशी एक नवीन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यन्त असणारी विचारधारा, राजकीय आरोप एक क्षणात नष्ट करत व्यक्तीस पवित्र करण्याची स्कीम, हे या योजनेचं वैशिष्ट्य.”

गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये जाणाऱ्या नेत्यांचा ओढा वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. आज रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. या संदर्भात रोहित म्हणतात, “सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक हेच आयात करण्यात आलेले उमेदवार करणार आहेत का? आणि तस असेलच तर मला ठाम विश्वास आहे तो सर्वसामान्य लोकांवर, हे लोकच आत्ता विकासाच बोला, कामाचं बोला म्हणून प्रचारासभेतच यांना फैलावर घेतील.” असे म्हणत त्यांनी रणजितसिंहांवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणतात की, “आत्ता मुख्यमंत्रीच म्हणाले आहेत, आगे आगे देखों होता हैं क्या? तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की आम्ही मुलेच नाही तर नातवंडे देखील पळवू. यांच्या या वाक्याचा अर्थ इतकाच की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच आम्हाला काहीही घेणदेणं नसून फक्त गटातटाचं राजकारण करत आम्ही उमेदवार निवडुन आणण्याासाठी काहीही करु शकतो.”

याशिवाय याच पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की, “विकासाच राजकारण फसल्यामुळे, लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरल्यानेच सत्ताधारी आत्ता लोकांपुढे गटातटाचं राजकारण अजून तीव्रतेने घेवून जात आहेत का ? मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून जाणिवपुर्वक भावनिक राजकारण खेळलं जाणार आहे का ? असे प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थि केले आहे.