शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू होताच रोहित पवार निघून गेले

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुणालाही काहीही कल्पना न देता अजित पवार यांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन यावरील स्पष्टीकरण दिले.

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले कि, अजित पवार यांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार आहे. मात्र शरद पवार हे रोहित पवार यांना पुढे करत असल्यामुळे अजित पवार नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तसेच कालच्या पत्रकार परिषदेच्या वेळी देखील रोहित पवार हे शरद पवार यांच्यासह गाडीत आले, मात्र परिषद सुरु होताच त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यामुळ अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर बोलताना रोहित पवार यांनी सांगितले कि, पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद नसून हा वाद उगाच उकरून काढू नका. शरद पवार यांनी याबाबत सर्व स्पष्ट केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

शरद पवार देखील अनभिज्ञ –

अजित पवार यांच्या या राजीनाम्याबाबत खुद्द शरद पवार यांना देखील माहिती नसल्याचे काल त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर राज्य सहकारी बँक घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे देखील पवारांनी सांगितले. तसेच राजकारणाची पातळी खालावल्याने देखील अजित पवार नाराज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

ज्या सहकारी संस्था उत्तमपणे चालवल्या त्याच प्रकरणात जर आरोप होत असतील तर काम न केलेलं बरं, असेदेखील अजित पवार यांनी आपल्या मुलांना म्हटल्याची माहिती पवारांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आपली शेती आणि उदयॊग करण्याचा सल्ला देखील त्यांनी आपल्या मुलांना दिल्याचे यावेळी पवारांनी सांगितले.