राज्यात परतणार्‍या बिहारी कामगारांची संख्या पाहून रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाउनमधील निर्बंध टप्प्याटप्प्यांमध्ये उठवण्यात आल्यानंतर परराज्यांमधील मजूर पुन्हा महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बिहारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमधून रोहित यांनी बिहारमधील नेत्यांमध्ये तेथील तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याची ताकद नसल्याने त्यांना महाराष्ट्रात यावे लागत असल्याचे म्हटले आहे.

बिहारमधील नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यात जी शक्ती खर्च केली विकासावर केली असती तर चित्र वेगळे असते. याशिवाय तेथील राजकारणामुळेच आहे त्याचठिकाणी राहिल्याचा टोलाही त्यांनी पोस्टमधून लगावला आहे. महाराष्ट्रात गच्च भरुन येणार्‍या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉक डाऊनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे लक्षात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्यावेळीही प्रेम दिले होते. आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली. बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठे दिसला नाही, असेरोहित यांनी म्हटले आहे. बिहार सरकारने विकासाचे राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल केली आहे.