विधानसभेसाठी रोहित पवार यांचा मतदारसंघ ठरला ; या ‘दिग्गज’ नेत्याशी सामना होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळींना सुरुवात झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारसंघांच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्रवादीने यासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये पवार कुटुंबियांतून रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनी कर्जतमधून उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित कर्जतमध्येच तळ ठोकून तेथील समाजकार्यात सक्रिय असल्याचे दिसून येत होते. पुण्यातील हडपसरमधूनही विधानसभेसाठी त्यांनी मतदारसंघाची चाचपणी केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी सातत्याने कर्जतचे दौरे करत मतदारसंघाची बांधणी केल्याचे लक्षात येत होते. येथील कार्यकर्त्यांची मोठी फळीही त्यांच्याबरोबर आहे. कर्जत मतदारसंघ सर्वच दृष्टीने सुरक्षित असल्याचे रोहित यांचे मत असल्याने त्यांनी तेथे लक्ष केंद्रित केले आहे.

 

या नेत्याशी होणार सामना :

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीविषयीही चर्चा चालू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम लागणार असे दिसत आहे, कारण त्यांना कर्जतमधून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे. असे झाल्यास भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांच्याशी त्यांची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

कर्जत मतदारसंघात रोहित पवार यांची वाढलेली सक्रियता पाहून माध्यमांनी रोहित कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल अंदाज व्यक्त केला होता. त्यांना याबद्दल प्रश्न विचारला असता ‘मी जिथे जाईन तिथे निवडणुकीला उभा राहीन का?’ असा प्रतिप्रश्न विचारून त्यांनी हि शक्यता फेटाळली होती.

रोहित पवार सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून मे महिन्यात शरद पवारांनी केलेल्या दुष्काळदौरा म्हणजे विधानसभेची तयारी आणि रोहित पवार यांचं लॉंचिंग असल्याचं बोललं जात होतं. या दुष्काळी दौऱ्यात रोहित शरद पवारांबरोबर फिरताना दिसत होते आणि पवारही आपल्या लाडक्या नातवाला सातत्याने मार्गदर्शन करत होते.

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे

‘वजन’ कमी करण्यासाठी योग्य ‘आहार’ ठरतो परिणामकारक

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव