शरद पवार वाढदिवस विशेष : रोहित पवारांनी लिहिलेल्या ’त्या’ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा

पोलीसनामा ऑनलाईन, अहमदनगर, दि. 12 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आजोबांना वाढदिवसाची पत्ररूपी भेट दिलीय. त्यांनी स्वत: ट्विटरवर ही माहिती दिलीय. राजकीय वर्तुळात या पत्राची जोरदार चर्चा होत आहे.

’महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड!. आदरणीय शरद पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा!,’ अशा शब्दांत नातू रोहित पवार यांनी पवारांना शुभेच्छा दिल्यात. तर, या निमित्ताने रोहित पवार यांनी आजोबांबद्दलच्या आपल्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. हे पत्रही त्यांनी सोशल मीडियातून शेअर केलंय.

’आदरणीय साहेब, तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला. पण, काही सूचत नव्हतं. तुमची वाचनाची आवड पाहून एखादं पुस्तक भेट देण्याचा विचार केला. पण, तुमचा व्यासंग पाहता ते तुम्ही आधीच वाचलेले असेल, अशी मला खात्री आहे, आणि तुम्ही स्वतः एक चालता-बोलता संदर्भग्रंथ आहात, म्हणून पुस्तकाचा विचार मागे पडला आणि यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आईला म्हणजेच माझ्या पणजीला (कै. शारदाबाई पवार) यांना लिहिलेले पत्र अचानक आठवलं. यातून तुमच्या जडणघडणीत आई-वडिलांचे जे स्थान आहे.

याबाबतच्या हृद्य भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खरंतर तुमच्या बाबतीत माझ्या मनात तशाच भावना आहेत. या भावना मांडाव्यात, असा विचार मनात आला. अन् तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे आणि खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय,’ असं आमदार रोहित पवार यांनी पत्रात म्हटलंय.

तसेच, या पत्रात त्यांनी आपल्या मनातील भावनांना ही वाट करून दिलीय. शरद पवार यांच्या बाबतचे अनुभव सांगितले आहेत.