‘कर्जत-जामखेड’ मधून रोहित पवार यांची उमेदवारी ?

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे संकेत: पालकमंत्र्यांचा गट अस्वस्थ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बीड येथे दुष्काळी दौऱ्यावर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज काही काळ जामखेड शहरात थांबले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यावर शरद पवार यांनी रोहित यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा गट अस्वस्थ झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्यात दुष्काळी दौ-यावर जात असताना जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सतिश शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी कोठारी यांच्या निवासस्थानातून पक्षाध्यक्ष शरद पवार हे गाडीत बसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी ‘रोहित पवार यांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ अशी मागणी केली. त्यावेळी रोहित पवारही मागे बसलेले होते. कार्यकर्त्यांची मागणीनंतर रोहितकडे पाहत ‘तुझी मागणी मान्य झाली’, असे हसत हसत शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या बोलण्यामुळे रोहित पवार यांना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळाले आहेत. रोहित पवार हेदेखील काही महिन्यांपासून या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याचे दिसते. त्याचा भाग म्हणून त्यांनी मतदारसंघात बारामती ॲग्रो कारखान्याच्यावतीने 80 टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

घरातून निघाल्यानंतर गाडीत बसलेल्या शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीची मागणी केली़