काँग्रेसकडून रोहित पवारांची कोंडी ? ; ‘कर्जत – जामखेड’ ची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास नकार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाने रोहित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची बैठक काल दादरच्या टिळक भवनात झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस रजनी पाटील आदी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुखनेते व पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत संवाद साधण्यात आला. नगर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस आघाडीच्या जागा वाटप सूत्रानुसार नगर जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा आहेत. शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या पाच जागांपैकी नगर शहरात राष्ट्रवादीचा आता आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादीलाच ठेवण्याचे ठरवले गेले आहे. मात्र, कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादीला न देता काँग्रेसने स्वतः लढवायची ठरवली आहे. मुंबईच्या बैठकीत जिल्ह्यात चार जागा लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या या निर्णयामुळे रोहित पवारांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

नगरबाबत गुरुवारी पुन्हा बैठक

नगर जिल्ह्यातून आमदार थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख व युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे असे चौघेच होते. अन्य पदाधिकाऱ्यांना वेळेत निरोप पोचले नसल्याने नगर जिल्ह्याबाबत येत्या गुरुवारी (१३ जून) पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. मात्र, या बैठकीत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार जिल्ह्यात नव्याने संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे.

ग्रामीण व नगर शहर जिल्हाध्यक्ष तसेच महिला जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह अन्य संघटनात्मक पदांवर नव्याने नियुक्त्या करण्याचे य़ा वेळी ठरवण्यात आले. त्यासाठीची नावे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी सहमतीने निश्चित करण्याचेही सांगण्यात आले.

तसेच गुरुवारच्या बैठकीस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समित्यांचे सदस्य, सभापती व उपसभापतींसह विविध ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त –

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय