IND vs NZ : जखमी झाल्यानंतर कोणत्या स्थितीत आहे ‘हिटमॅन’ ? रोहितनं दिलं स्वतः ‘अपडेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी -२० सामन्यात विराट कोहलीच्या जागेवर टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणारा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा बॅटिंग करताना जखमी झाला. दुखापतीमुळे रोहित शर्मा फिल्डिंग करण्यासाठी मैदानात गेला नव्हता, परंतु त्याचा साथीदार लोकेश राहुल म्हणाला की तो काही दिवसांत बरा होईल.

फिल्डिंगच्या दरम्यान रोहितच्या अनुपस्थितीत राहुलने संघाचे नेतृत्व केले. मालिकेच्या अंतिम सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, ‘सध्या रोहित शर्माचे मूल्यांकन केले जात आहे.’

सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभादरम्यान राहुल म्हणाला, ‘रोहित ठीक आहे, दुर्दैवाने त्याला दुखापत झाली असून काही दिवसातच तो बरा होईल अशी आशा आहे.’ तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या रोहितला डाव्या पोटरीवर षटकार मारताना दुखापत झाली. त्याने ४१ चेंडूत तीन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या.

माउंट मौनगुनी येथे खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ धावांनी पराभूत केले. यासह भारताने न्यूझीलंडला ५-० ने धुडकावले आहे. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका बुधवारी ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.