रोहित शर्माचा पहिला चेक किती रुपयांचा होता ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली असली तरी भारतीय खेळाडू अजूनही घरातच आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. पण 20 ऑगस्टपर्यंत खेळाडूंना घरातच बसून राहायचे आहे, त्यामुळे खेळाडू घरी विश्राम घेत आहेत. अशा काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने नुकतेच ट्विटरवर प्रश्नाोत्तरांचे सत्र घेतले. त्यात रोहितने वैयक्तिक आयुष्यापासून ते क्रिकेटबद्दलची सगळी उत्तरे दिली.

ट्विटरवरील या प्रश्नोत्तरांच्या सत्रात एका चाहत्याने रोहितला पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारला. तुला क्रिकेट खेळताना पहिला चेक कधी मिळाला होता? तो चेक किती रूपयांचा होता? आणि त्या पैशाचे तू काय केले?, त्यावर रोहितने छान उत्तर दिले. माझा पहिला चेक (धनादेश) हा खरं तर चेक स्वरूपात नव्हता. मला रोख बक्षीस म्हणून मिळाले होते. मी आमच्या सोसायटीजवळच मित्रांबरोबर खेळताना मला ते पैसे मिळाले होते. ते बक्षीस होते 50 रूपये.

मी त्या पैशातून सगळ्या मित्रांसोबत जाऊन टपरीवरचा वडापाव खाल्ला होता, असे रोहितने सांगितले. तुला मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? या प्रश्नावर रोहितने अगदी झकास उत्तर दिले आहे. जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक.