Rohit Sharma Khel Ratna : मुंबईकर रोहित शर्माला मिळणार राजीव गांधी ‘खेलरत्न’, इतर 4 खेळाडूंना देखील बहुमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला पसंती दिली आहे. खेलरत्न हा भारताच्या नागरिकाला देण्यात येणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.


राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर असणार आहे. रोहित शर्मापूर्वी सचिन तेंडुलकर (1997-98), एमएस धोनी (2007) आणि विराट कोहली (2018) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी 12 सदस्य निवड समितीने द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांच्या नावाची शिफारस केली होती. तर मंगळवारी समितीने राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची नावेही अंतिम केली आहेत.

उत्कृष्ट कामगिरीमुळे खेलरत्न

भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत संघासाठी शानदार कामगिरी केली . रोहित शर्माने एक क्रिकेटर म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध केले आहे. म्हणूनच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीने रोहितला खेलरत्न देण्याची शिफारस केली. या समितीमध्ये माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, रोहितने मागील वर्षी खेळलेल्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती.