लोकसभा निवडणुकीतील भूमिका : खासदार गांधींची रविवारी बैठक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी खा. दिलीप गांधी यांच्या समर्थकांची रविवारी (दि. 24) टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करायचा की वेगळी भूमिका घ्यायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. खा. गांधी यांच्या बैठकीमुळे विखे यांची अस्वस्थता वाढली आहे.

खा. दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून नुकताच भाजपात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणेतून लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी व त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांनी खासदार गांधी यांना आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र सध्या तरी गांधी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची हे लवकरच ठरवू, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार रविवारी दुपारी एक वाजता टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे खा. गांधी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खा. गांधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम करून डॉ. सुजय विख यांचे काम करायचे, वेगळी भूमिका घ्यायची की शांत रहायचे, याबाबत खा. गांधी यांच्याकडून रविवारी भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.