आमदार कर्डिले यांची भूमिका विखेंसाठी अडचणीची ?

महायुतीच्या मेळाव्यात हात वरच जाईनात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका भाजपचे उमेदवारासाठी अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात व्यासपीठावरील सर्व नेते हात उंचावत असताना आ. कर्डिले यांचे हात अर्ध्यावरच दिसत होते. ते वरून कितीही पक्षाच्या बाजूने बोलत असले, तरी आतून मात्र जावई आमदार संग्राम जगताप यांच्या बाजूने राहतील, असे चित्र आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराची चांगलीच पंचाईत होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्यावतीने नुकताच भाजपात प्रवेश केलेले सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह पक्षातील जिल्ह्यातील प्रमुख नेते, आमदार उपस्थित होते. या मेळाव्याप्रसंगी महायुतीच्या सर्व नेत्यांनी हातात हात घेऊन उंचावत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार केला होता. सर्वांचे हात उंचाविलेले असताना आ. कर्डिले यांचे हात मात्र अर्ध्यावरच लटकलेले दिसत होते. कर्डिले हे किती पक्षनिष्ठेच्या गप्पा हाणत असले, तरी त्यांचे अंतर्मन मात्र जावई संग्राम जगताप यांच्या बाजूने आहेत, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळेच त्यांचा हात इतर नेत्यांप्रमाणे उंचावले गेले नाहीत. ही बाब चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असूनही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्रप्रेमापोटी डॉ. सुजय विखे या भाजप उमेदवारांच्या प्रचार करीत आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे त्यांचे पुत्र प्रेम दाखवत असतील, तर शिवाजी कर्डिले यांनी जावई प्रेम का दाखवू नये, असाही सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. आमदार कर्डिले यांच्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. आ. कर्डिले यांना मानणारा राहुरी मतदारसंघ व नगर तालुक्यात मोठा वर्ग आहे. या ठिकाणी त्यांची आ. संग्राम जगताप यांनी ‘लिड’ देण्यास मदत केल्यास विखे यांच्या विजयाचा मार्ग कठीण होणार आहे. हीच भूमिका भाजप उमेदवारासाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.