ठाकरे सरकारला मोठा धक्का ! अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची भूमिका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणार्‍या उद्धव ठाकरेच्या सरकारला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या भूमिके मुळे मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तर आता होणारच हे स्पष्ट झाले आहे.

कोरोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारने कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. अभियांत्रिकी व अन्य व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांना विनंती केली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा अनिवार्य असल्याचे नमूद केल्याने राज्य सरकारला परीक्षा घेण्याशिवाय पर्याय नाही. कला, विज्ञान व वाणिज्य शाखांच्या परीक्षा टाळण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.

दरम्यान, परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी विरोध दर्शविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याची भूमिका घेतली असताना राज्य सरकार वेगळी भूमिका कशी घेते, असा सवालही राज्यपालांनी केला. परंतु तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने युवासेनेने परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडली . आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे शेवटी परीक्षा रद्द करण्याचा आदेश सरकारने काढला होता.