मुंबईत एक्सप्रेस ट्रेनमध्ये सापडलं चक्क 2 कोटींचं ड्रग्ज !

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन –  एर्नाकुलम् मंगला एक्सप्रेसमधून रेल्वे पोलिसांनी तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करत मोठी कारवाई केली आहे. कोरोनाच्या काळात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ड्रग्ज तस्कारांचे कारनामे सुरुच असल्याचे यावरून उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. मुंबईत कुख्यात असलेल्या याच टोळीच्या लोकांचा हा प्रताप असल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्या देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्व व्यवहार बंद होते. वाहतुकही बंद होती. याच काळात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसला होता. मात्र, आता सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गुन्हेगारांना आपले तोंड पुन्हा वर काढले आहे. व्यवहार सुरळीत होत असताना गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. एका ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि एर्नाकुलम् मंगला एक्सप्रेसमधून Amphetamines हे ड्रग्ज जप्त केले.

एक्सप्रेस गाडीच्या AC-3 TIER कोचमधून प्रवास करणाऱ्या एका नायजेरीयन प्रवाशाच्या सामानातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. अतिशय हुशारीने ओळखू येणार नाही अशा पद्धतीने त्याने ड्रग्जची पाकिट लपवून ठेवली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग अखेर फुटले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 2 कोटी रुपयापेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षापासून मुंबईत राहणारे नायजेरीयन माणसं यामध्ये गुंतल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. या लोकांची एक मोठी टोळी असून स्थानिक लोकांच्या मदतीने हे गुन्हेगार मुंबई आणि सर्व देशात ड्रग्जचा पुरवठा करत असतात. या टोळीतील अनेक गुन्हेगारांना आतापर्यंत अटक करून ही टोळी उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. मुंबईतील मिरारोड, वसई सारख्या काही भागांमध्ये या लोकांची मोठी संख्या आहे.