हडपसरमध्ये RPI च्या कार्यकर्त्यांचा मोर्चा !

हडपसर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – आरपीआय कामगार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष रामभाऊ कर्वे यांनी मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर आरपीआयच्या वतीनं हडपसर पोलीस ठाण्यावर पोलिसांचा निषेध मोर्चा काढला. संबंधित पोलिसांची बदली करण्याची मागणी केली. वैभव थिएटर शेजारील एका हॉटेलसमोर पार्सल घेण्यासाठी रामभाऊ थांबले होते. यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता.

मास्क न घातल्यानं नियमानुसार पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी मारहाण केली. त्यामुळं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. एकीकडे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध धंदे वाढले आहेत. याकडे पोलीस अर्थपूर्ण संबंध असल्यानं दुर्लक्ष करत आहेत अशी तक्रार यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी आरपीआयच्या महिला शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात, महादेव कांबळे, गौतम वानखेडे, विक्रम आल्हाट, आशिष आल्हाट, प्रदीप कांबळे, गजेंद्र मोरे, मीनाताई गालटे, सुखदेव कांबळे उपस्थित होते.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.