एकनाथ खडसेंसोबत 15 आमदार जाणार नाहीत, रामदास आठवलेंचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपचे 10-12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाहीत असे खडसे म्हणाले होते. खडसे यांच्या दाव्याचे रिपाइं नेते (RPI) आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी खंडन केले आहे. भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जातील, त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण 15 आमदार जाणार नाहीत, असा दावा आठवले यांनी केला आहे. तसेच त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाईंत यायला हवं होतं, असेही ते म्हणाले.

रामदास आठवले हे आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना खडसे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खडसे यांच्यासोबत 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रीपद देखील मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही, असे सांगताना खडसे यांनी रिपाईंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचा होता तर त्यांना रिपाइं चांगला पर्याय होता. मात्र, ते राष्ट्रवादीत गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले पुढे म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचे सांगताना आठवले म्हणाल की, जीएसटीचे (GST) केंद्राकडे बाकी असलेले पैसे मिळतील. पण सद्यस्थितीबाबत सर्वांनी मिळून केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा असे देखील रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.