रामदास आठवलेंनी सांगितलं वेगळं गणित, म्हणाले – ‘…तर उद्धव ठाकरेंना 2 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळेल’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्विटल जोरदार उत्तर दिलं. हम भी नहीं है कुछ कम असं ते म्हणाले आहे. इतकंच नाही तर त्यांनी शिवसेनेला नवीन ऑफरही दिली आहे. आज शिर्डीत झालेल्या आरपीआयच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भाजप सोबत यावं. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी भाजप सोबत येण्याची गरज असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेचं जाणं योग्य नाही. तुम्हाला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेईन.

पुढं बोलताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे कधी जाणार, यापेक्षा आमचा प्रश्न आहे अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत कधी येणार ? याआधी सुद्धा ते आमच्या सोबत आलेले आहेत. फडणवीस म्हणतात की, मी पुन्हा येईन. अजितदादा आले तर पुन्हा येणार हे त्यांना माहित आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच जाणार असून तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम न करता एकमेकांवर टीका करत आहेत.

युपीए नेतृत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठींबा काढण्याची शक्यता व्यक्त करत हे सरकार पडलं की, आमचं सरकार आल्याशिवार राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.