रिपब्लिकन पक्षासाठी ‘या’ 6 जागा निश्‍चित, दिपक निकाळजेंसह 4 ठिकाणी उमेदवार जाहीर : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. गेल्या 3 दिवसांपासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून अंतिम निर्णय झाला आहे. भाजपा-शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 6 जागा सोडण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. दरम्यान, फलटणमधून दिपकभाऊ निकाळजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर, परभणी जिल्हयातील पाथरी, सोलापूर जिल्हयातील माळशिरस, सातारा जिल्हयातील फलटण, मराठवाडयातील नांदेड जिल्हयातील नायगाव आणि विदर्भातील भंडारा या 6 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसची जागा रिपाईंला सोडण्यात आली असून तेथील नाव निश्‍चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते-पाटील हे घेणार आहेत. तेथील रिपाईच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्‍चीत होत नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी मागणी देखील आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ
1. मानखुर्द-शिवाजीनगर (गौतम सोनवणे – रिपाईचे मुंबईचे अध्यक्ष)
2. फलटण (दिपकभाऊ निकाळजे)
3. पाथरी (मोहन फड)
4. नायगाव (राजेश पवार)

भंडारा आणि माळशिरस येथील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ती लवकरच जाहीर करण्यात येतील असं रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com