आर.आर. आबांचे निर्मलस्थळ वर्षभरात विकसीत करणार : अजित पवार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर नेत्याचे समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसीत केले जाईल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील आबा यांच्या 5 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी तासगाव तालुक्यातील अंजनी येथे आबांच्या जन्मस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अभिवादन करण्यासाठी अंजनी गावात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी वर्षभरात निर्मलस्थळाचे प्रलंबित काम वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे आबा पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे पुरस्कार आर.आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी वितरीत करण्याचा मानस असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आर.आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.