Update : पाकिस्तानमार्गे नवी मुंबईत आणलं तब्बल 1 हजार कोटीचे 191 किलो हेरॉइन, दोघांना अटक

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डीआरआय आणि कस्टम विभागाने मोठी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार कोटी रुपये किंमत आहे. हेरॉईन अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे या बंदरात आणण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, तस्करांनी हेरॉईन प्लास्टिकच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे पाइप बांबूसारखे वाटावेत अशा पद्धतीने त्यांना रंगवण्यात आले होते. आयुर्वेदिक औषध असल्याची बतावणी तस्करांनी केली. परंतु अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले. डीआरआय आणि कस्टम विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत हेरॉईन आयातीचे कागदपत्र तयार करणाऱ्या दोन कस्टम हाउसच्या एजंटना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीच्या एका फायनान्सरलाही अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईला घेऊन येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्या दोघांना मुंबईच्या एका न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हेरॉइन अनेक कंटेनरमधून आणण्यात आले होते. त्यामुळे आता कंटेनर मालकाची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.