स्पेशल टास्क फोर्सची मोठी कारवाई, घरात सापडले तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पश्चिम बंगालमध्ये स्पेशल टास्क फोर्सने (STF) ने मोठी कारवाई केली आहे. घरामधून तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच सोन्याचे दागिने (Jewellery), दोन लॅपटॉप (laptop) आणि दोन स्मार्टफोन (smartphones) जप्त करण्यात आले आहेत. कोलकता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीट येथील एलियट रोडवर टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एलियट रोडवरील पार्क स्ट्रीट परिसरात एका घरावर एसटीएफने छापा टाकला. तेव्हा घरामध्ये पैशांनी भरलेली एक बॅग सापडली. या बॅगेमध्ये नोटांचे बंडल आढळून आले आहेत. रकमेसोबतच दोन लॅपटॉप आणि दोन स्मार्टफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. जवळपास 1 कोटी 62 लाखांची रोकड असल्याची माहिती मिळत आहे. मात्र घरातील सदस्यांना घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याबाबत विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही.

देशी बनावटीच्या 8 पिस्तुल जप्त

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून काही लोकांची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे एसटीएफने आणखी एक छापा टाकला आहे. स्टरँड रोडवर हा छापा टाकला असून यामध्ये देशी बनावटीच्या आठ पिस्तुल सापडल्या आहेत. यावेळी घरात असणाऱ्या दोन हत्यार विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) हैदराबादमधील मल्काजगिरी परिसरात राहणाऱ्या एसीपीच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईत 70 कोटीहून अधिक अवैध संपत्ती समोर आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावोरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नरसिम्हा रेड्डी असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. रेड्डी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला असता हा प्रकार समोर आला होता.