‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या मुंबई पोलिसांच्या कुटूंबियांना मिळणार 65-65 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस दल मोठी भूमिका निभावत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांना 50 लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळते. सरकारी मदतीशिवाय या पोलिसांना मुंबई पोलीस फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख रुपयाची जादाची मदत मिळणार आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हा निर्णय घेतला असून मुंबई पोलिसांचे प्रवक्ता पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी याला पुष्टी दिली आहे.

मुंबईत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगारांसह पोलीस जवानही 24 तास कर्तव्य बजावत आहेत. यातून अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तपर्यत कोरोनामुळे 8 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या पोलिसांना शासनाच्या घोषित मदतीशिवाय मुंबई पोलीस फाऊंडेशनच्या वतीने 10 लाखाची आर्थिक मदत मिळणार आहे. प्रादेशिक विभाग आणि विविध घटक (झोन) मध्ये मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. संकलित केलेली माहिती मुंबई पोलीस फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर पाठविण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला 65 लाखांची मदत
कोरोना विरुद्धच्या लढ्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 65 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे. एक्सिस बँकेकडून मिळणाऱ्या 5 लाख रुपयाची विम्याची रक्कम दोन मृत पोलिसांच्या खात्यात जमा झाली आहे. तर उर्वरित मृत पोलिसांच्या खात्यात एक-दोन दिवसात ती रक्कम जामा होईल. शासनामार्फत मिळणारी प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत आतार्पयंत तीन मृत पोलिसांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. इतरांच्या खात्यात लवकरच जमा होईल. मुंबई पोलीस फाऊंडेशनचे 10 लाखाची रक्कम जवळपास सर्वच मृत पोलीस जवानांच्या खात्यात जमा झालेली आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त बजाज यांनी दिली.

कोरोना युद्धात शहीद पोलीस जवान- अधिकारी
1. अमोल हनुमंत कुलकर्णी – सहाय्यक पोलीस निरीक्षक, शाहू नगर पोलीस ठाणे
2. मधूकर माने – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नागपाडा परिवहन विभाग
3. मुरलीधर वाघमारे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिवडी पोलीस ठाणे
4. सुनिल दत्तात्रय करगुटकर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विनोबा भावे पोलीस ठाणे
5. चंद्रकांत गणपत पैदूरकर – पोलीस हवालदार, वाकोला पोलीस ठाणे
6. संदीप महादेव सुर्वे – पोलीस हवालदार, संरक्षण व सुरक्षा विभाग
7. शिवाजी नारायण सोनवणे – पोलीस हवालदार, कुर्ला वाहतूक विभाग
8. नाईक भागवत सुरेश – पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे