पूरग्रस्त केरळला यूएईकडून ७०० कोटींची मदत

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन 
केरळ मध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला.केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर  मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळ साठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यानंतर आता परदेशातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केरळ करिता यूनायटेड अबर अमिरातकडून (UAE) ७०० कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याबाबत माहिती दिली.
केरळातील अनेक लोक कामाधंद्याच्या निमित्ताने यूएईमध्ये वास्तव्यास असतात. अमिरातीच्या विकासात केरळी लोकांचं योगदान लक्षात घेता यूएई सरकारने ही मदत केली आहे.केरळमध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला होता. पुराने वेढा घातला होता. कालपासून पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता केरळला मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरुन मदत केली जात आहेच, सोबत वैयक्तिक पातळीवरही अनेकजण केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपापल्या परीने योगदान देत आहेत. केरळमधील पुरात आतापर्यंत ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, १० लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. शिवाय, कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत.
केंद्र सरकारने केरळला ५०० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली, तसेच विविध राज्यांनीही मदतनिधी दिला आहे. महाराष्ट्राने २० कोटी रुपये दिले, तसेच ११० डॉक्टरांच्या टीमसोबत स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन केरळच्या मदतीसाठी गेले आहेत.
दिल्ली सरकारने १० कोटी, तेलंगणा २५ कोटी, आंध्र प्रदेश १०  कोटी आणि पंजाब सरकारने केरळला १०  कोटींचे  अर्थसहाय्य जाहीर केले  असून, तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे.
 केरळातील पूरपरिस्थितीला केंद्र सरकारने  तीव्र नैसर्गिक संकट जाहीर केलं आहे. पुराची तीव्रता आणि कोसळलेल्या दरडी यामुळं गृहमंत्रालयाने  हा निर्णय घेतला. केरळमध्ये महापुराने थैमान घातले. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे.
दरम्यान, केरळमधील परिस्थितीवर चर्चेसाठी ३० ऑगस्ट रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केरळ सरकारने राज्यपाल पी. साथसिवम यांना केली आहे. तत्पूर्वी, आज दुपारी ४ वाजता केरळ सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत केरळमधील परिस्थितीवर चर्चा केली जाईल.