पंकजा मुंडे भाजप सोडणार का ? जानकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर भाजपला सत्ता गमवावी लागली आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. त्यानंतर भाजपातील अनेक नाराज नेते भाजपला सोडचिट्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव देखील होते. त्यातच पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरून भाजपचा उल्लेख हटवला होता त्यानंतर तर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

पंकजा मुंडे या भाजपला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरु होती. त्यासोबतच त्यांच्याकडे महादेव जानकरांच्या रासपचा देखील पर्याय खुला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जानकर यांनी याबाबत खुलासा करताना या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पंकजा मुंडे भाजप सोडू शकत नाहीत असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे.

एवढा मोठा पक्ष सोडून छोट्या पक्षात त्या कशाला जातील, पंकजा मुंडे यांचा शेवटचा श्वास असेपर्यंत त्या भाजप सोडू शकत नाहीत असे देखील महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 12 डिसेंबर रोजी त्या गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत असे जानकर यांनी सांगितले.

अनेक जेष्ठ नेते बंड करणार ?
भाजपला विरोधी पक्षात बसायला लागल्यानंतर भाजपमधून नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्धार दाखवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ खडसे यांनी तर अनेकदा आपली नाराजी व्यक्त देखील केली आहे. तसेच पंकजा मुंडे यादेखील भाजप सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मुंडे यांच्यासोबत अनेक भाजप जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते.

भाजपने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता असे अनेक नेते भाजपविरोधात बंड करणार आहेत. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे सुद्धा पक्ष सोडणार आहेत अशा चर्चा सुरु होत्या. मात्र 12 डिसेंबरला पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी काय संवाद साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com